Monday, July 17, 2017

त्याच तीच भांडण ओल्या चिंब दिवसात


"#त्याचं #तिचं #भांडण.. #ओल्या #चिंब #दिवसात!"

बाहेर निळ्या आभाळाचं..
धरतीशी द्वंद्व चालू असतं;
घरात मात्र त्याचं तिच्याशी..
'चहा' वरुन बोलणं बंद असतं!

दिवस तसा सरुन जातो;
रात्रीचं काही ठरत नाही..
ती त्याच्याशी बोलत नाही..
आणि हा ही मनातलं खोलत नाही!

कशी बशी जेवणं आवरतात..
मग झोपायची वेळ होते..
वातावरणात गारवा असला तरी..
ती पंखा चालू करते!

गारठ्यात बिचारा कुडकुडतो तो..
अशात अर्धी मध्यरात्र सरते,
नेहमीच्याच लुटूपुटूच्या भांडणाची..
एक वेगळी त-हा ठरते!

शेवटी त्याचा राग मग फेर धरतो..
तडक जावून तो पंखा बंद करतो;
पुरुषावर शेवटी भारीच बाई..
या विषयावर अखेर पडदाच  सारतो!

ती पुन्हा पंखा चालू करते..
झोपी गेलेल्या भांडणावर नव्याने लाली चढते;
त्याचं तिचं भांडण पाहून;
पावसाची सर ही क्षणभर विरते!

आता काय होणार या भितीनं..
गारव्याला ही चांगली धडकी भरते!
अहो इथंच मोठी गंमत होते..
दिवसभराचं भांडण विसरुन;
ती अलगद त्याच्या कुशीत शिरते!

पुढंच काही विचारु नका..
'आणि पुढे काय घडते!'
पावसाळ्यात रात्रीच्या अंधारात म्हणे..
घट्ट मिठीत प्रेम नव्याने फुलते.
घट्ट मिठीत प्रेम नव्याने फुलते!

- शशांक कोंडविलकर

No comments:

Post a Comment