Thursday, March 30, 2017

अनुमान


"अनुमान "

एखाद्याच्या मनाच्या शांततेवरुन..
अनुमान बांधण्यात अर्थ नाही;
ब-याचदा राखेच्या आच्छादनाखालीही..
सलती आग धगधगत असते,

ही दुनिया अगदी स्वस्तातच..
लूटून जाते बिनबोभाटपणे;
ज्यांना ख-या अर्थाने..
स्वतःची किंमतच कळलेली नसते.

- शशांक कोंडविलकर


Tuesday, March 28, 2017

शिवार मनाचं

"शिवार मनाचं"

गरजेच्या 'भिंतीतली'..
एक 'विट' काय पाडली;
हळूहळू स्वप्नांच्या झोक्यांनी..
शिरकावाच केला,
खरं तर थोड्याश्या 'कमी' मध्ये ही..
समाधानाची 'हमी' होती;
पण अपेक्षांच्या 'खोली' मुळे..
जगण्याचा 'तोलच' गेला.

- शशांक कोंडविलकर


Sunday, March 26, 2017

राख


"राख"

आज स्मशानातली 'राख' बघून मनात विचार आला..

"शेवटी राखच होणार; हे माहीत असून ही आपण..
आयुष्यात कित्येकदा.. दुस-यावर जळत असतो,

मृगजळ अपेक्षांच्या मागे; पळत राहतो अविरत निरंतर..
आणि अनभिग्नपणे खरं तर.. स्वतःलाच छळत असतो!"

- शशांक कोंडविलकर





Sunday, March 19, 2017

माफी

"माफी"

"आज सगळ्यांची माफी मागायचं ठरवलं होतं,
सहजच आरशासमोर उभा राहिलो..
लक्षात आलं इतरांच्या ईच्छा पुर्ण करता - करता.
सगळ्यात जास्त.. स्वतःचच मन दुखावलं गेलं होतं!"

- शशांक कोंडविलकर



Thursday, March 16, 2017

मी

"मी"

माझ्या विरुद्धची 'बोलणी'..
मी नेहमी 'शांतपणे' ऐकून घेतो,
कारण 'उत्तर' देण्याचा हक्क..
मी 'वेळेला' देण्याचं ठरवलं आहे.

नेहमीच अस्तित्वाच्या शोधात..
भरकटत राहिलो आजवर,
आज माझ्यातल्या 'मी' पणाला..
पुन्हा माझ्यातचं 'जिरवलं' आहे.

- शशांक कोंडविलकर

Tuesday, March 14, 2017

अंतिम सत्य

"अंतिम सत्य"

झिजण्यात तेव्हाच अर्थ आहे..
जेव्हा त्याची योग्य कदर होते..
कारण प्रखर उजेडात..
लख्ख दिव्यालाही नेहमी दुर्लक्षित केले जाते..
इथं तर किती तरी स्मशानं..
अशा लोकांच्या राखेने भरललेली आहेत;
ज्यांना नेहमीच हो वाटायचं..
'दुनिया त्यांच्या शिवाय बंदच रहाते.

- शशांक कोंडविलकर





Thursday, March 9, 2017

.. बाकी मी मस्त आहे

"बाकी..मी मस्त आहे "

बुजरेपणात आता, उत्तुंग कोडगेपणा जास्त आहे..
तशी आहे तुझी कमी थोडी, पण बाकी मी मस्त आहे!

कोंडतो कधी श्वास थोडासा, एकटेपणाच्या भीतीने..
त्यावरही solution म्हणून, उप-यांची उत्स्फुर्त गस्त आहे..
तशी आहे तुझी कमी थोडी, पण बाकी मी मस्त आहे!

बंधन नाही तसे कुणाचे, हवे ते कराया मोकळा मी..
फक्त सल तुझ्या आठवांची, ती ही.. जरा जास्त आहे..
तशी आहे तुझी कमी थोडी, पण बाकी मी मस्त आहे!

आता पुर्वी सारखी झोप नसते अगदी छान निसंकोंचाची..
ते ही बरंय म्हणा, भलत्या स्वप्नापासून सुटका.. उतारवयात रास्त च आहे..
तशी आहे तुझी कमी थोडी, पण बाकी मी मस्त आहे!

एक दिवस बनेनच राख मी, मातीच्या मिलनाची..
तेव्हा तुला कळेल, आर्तता रित्या क्षणाची विरहात Vast आहे..
तशी आहे तुझी कमी थोडी, पण बाकी मी मस्त आहे!

- शशांक कोंडविलकर


Tuesday, March 7, 2017

प्रतिमा

प्रतिमा..

ऐक ना खूप छान दिसतेस गं तू .. अगदी गोड!
पण नेहमीच का गं तू अशी नसतेस..
सतत कुठल्या ना कुठल्या विवंचनेत असल्यासारखी वाटतेस..
लोकं कधी तुझे गुणगान गातात तर कधी  शिंतोडे ही उडवतात..
अगदी तू सच्ची असलीस तरी..

मला कळत नाही.. तू एवढं का गं सहन करतेस..
मानापमानाच्या पारडयावर  नेहमीच तू
अधांतरी असतेस..

असं ऐकलय.. तुला घडायला खूप वेळ लागलेला..
नाही तसं खरंच आहे म्हणा.. तुझं घडणं कठीणच आहे तसं..
पण ऐक ना.. मला ही तुझ्यासारखं बनायचयं..
काही  तरी वेगळं करुन..

पहिल्यांदा बाई चुल आणि मुलं यासाठीच ओळखली जायची..
पण आता तरी  परिस्थिती कुठे वेगळी आहे
फक्त त्यात Tool ॲड झालयं.. म्हणजे "चुल, मुल आणि टुल.."

अहं.. तुझी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती होतेय.. यात दुमत नाही..
पण तुझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अजून तसाच आहे संकोचित..
Special occasion ला तुला छान सजवलं जातं..
पण वर्षभर... असो..

आजकाल बाईला एक निर्जीव अवजार/ हत्यार
म्हणून प्रत्येक जण आपल्या फायद्यानुसार वापरतो.
पण मला असं नाही बनायचयं..

मला तुझ्या चांगल्या अर्थात ख-या रुपात
घडायचय! मग देशील ना साथ.. प्रिय 'प्रतिमा..!'
तुझीच आश्वासक 'स्त्री...'

💐" जागतिक महिला वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!"💐

- शशांक कोंडविलकर

Monday, March 6, 2017

दर्पण

"दर्पण"

'जख्मी' तर आज ही 'नजरा' होतात..
जेव्हा कोणी बघून ही 'दुर्लक्षीत' असल्याचं भासवतं,
'दर्पण' आज ही पकडलं जातं देहाची 'लाच' घेताना..
हृदयात यातना असूनही चेह-यावर विनाकारण हसवतं.

- शशांक कोंडविलकर


Saturday, March 4, 2017

अबाधीत सत्य


"अबाधीत सत्य"

जगात दोन गोष्टींचा अंत नसतो,
देवाच्या कथा आणि आयुष्याच्या व्यथा..
भले कुणाचं भलं करणं जमत नसलं,
तरी आपल्या भल्यासाठी शोधत असतो..
आपण रोज नवा त्राता.

- शशांक कोंडविलकर
💐💐🌸🌸💐💐




Friday, March 3, 2017

जगाचं सुत्र

"जगाचं सुत्र"

सारं काही मनासारखं घडलं असतं तर,
जिंकण्याची 'ईर्षा' ना हरण्याची 'नड' असती..
जर हरवण्याची 'भीती' आणि मिळवण्याची 'खोड' नसती,
तर ना भक्तीची 'मिती' ना ईश्वराची 'ओढ' असती!

- शशांक कोंडविलकर